Pages

Thursday, 12 September 2019

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 2 बेवसाईट्स

शेतकऱ्यांना परिस्थितीचा सामना करता यावा तसेच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या घालाव्या लागू नयेत म्हणून सरकारने अनेक वेबसाईट आणि पोर्टल्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. ज्याद्वारे शेतकऱ्यांना अनेक हिताच्या योजनांची घरबसल्या माहिती घेता येऊ शकते. शिवाय कृषी विभागाचे मार्गदर्शनही मिळवता येऊ शकते.

1. माती आरोग्य कार्ड योजना
मातीचं आरोग्य तपासून पीक घेण्यासाठी शासनाकडून सॉईल हेल्थ कार्ड ही योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या सेतू किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी जाऊन www.soilhealth.dac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर या पोर्टलमध्ये आपले स्वतःचे खाते तयार करावे लागते. या कार्डअंतर्गत त्या भागातील प्रयोगशाळेत मातीचे आरोग्य तपासले जाते. त्यावरुन संबंधित शेतातील मातीत कोणते पीक चांगले येऊ शकेल, त्याला पोषक औषधे आणि त्यांचे प्रमाण कसे असावे, याची माहिती मिळवता येते. या सुविधेमुळे शेतकरी आपल्या शेतीला पोषक असे पिक घेऊ शकतात. या संकेतस्थळावर मराठी भाषेसह एकूण 22 भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.

2. शेतकरी पोर्टल
शेतकरी www.farmer.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर त्यांचे गाव, गट, जिल्हा किंवा तालुका निवडावा लागतो. त्यानंतर आवश्यक त्या पीकासंबंधित माहिती किंवा किटकनाशके, पीककर्ज यांबाबत सर्व विस्तृत माहिती या वेबसाईटवर मिळते. ही माहिती आपल्याला समजणाऱ्या भाषेतील मजकूर, एसएमएस, ई-मेल किंवा ऑडिओ किंवा व्हिडीओ अशा स्वरुपात दिली जाते. गृहपृष्ठावर देण्यात आलेल्या भारताच्या नकाशाद्वारे सहजपणे या पातळ्यांवर जाता येते. शेतकऱ्यांना विशिष्ट प्रश्न विचारता येतील तसेच प्रतिक्रियाही देता येते.

Wednesday, 11 September 2019

अ‍ॅपलचा धमाका; आयफोन 11 लाँच, जाणून घ्या फिचर्स







अमेरिकेत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात ‘अ‍ॅपल’ने आयफोनचे 11, 11 प्रो व 11 प्रो-मॅक्स हे तीन प्रकार सादर केले. यासह 7th Gen Ipad आणि Apple Watch Series 5 देखील लाँच करण्यात आली. iphone 11 च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 699 डॉलर्स, iphone 11 Pro च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 999 डॉलर्स, तर iphone 11 Pro Max च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 1,099 डॉलर्स ठेवण्यात आली आहे. 64 GB, 128 GB आणि 256 जीबी व्हेरिअंटमध्ये तिन्ही iphone उपलब्ध असतील.
भारतामध्ये हा नवा iphone सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतात iphone 11 च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 64,900 रूपये, iphone 11 Pro च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 99,900 रूपये आणि iphone 11 Pro Max च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 1,09,900 रूपये असेल.
iPhone 11 Pro :
● या फोनची डिजाईन नेहमीपेक्षा वेगळी देण्यात आली आहे.
● या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे.
● सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे.
● A13 Bionic प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.
● फोनची बॅटरी 4 तास अधिक चालेल असा कंपनीचा दावा आहे.
● या फोनची किंमत 72 हजार रुपयांपासून सुरु होणार आहे.
iPhone 11 :
● या फोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरा देण्यात आले आहेत.
● 6 वेगवेगळ्या रंगात हा फोन उपलब्ध होणार आहे.
● 6.1 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.
● यामध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉसचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
● 12 मेगापिक्सलचा वाईड आणि अल्ट्रा वाईड कॅमेरा देण्यात आला आहे.
● अल्ट्रा वाईड अँगलमध्ये नाईट मोड देखील देण्यात आला आहे.
● 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
● या फ्रंट कॅमेराद्वारे स्लो मोशन व्हिडीओ रेकॉर्ड करता येणार आहे.
● आयफोन 11 ची किंमत 50 हजार रुपयांपासून सुरु होईल.
वरील दोन्ही मॉडेल मिडनाइट ग्रीन, स्पेस ग्रे, सिव्हर व गोल्ड रंगांत उपलब्ध असणार आहे.
किंमती अशा :
✔ iPhone 11 (64 जीबी) : 64 हजार 900 रुपये
✔ iPhone 11 Pro (128 जीबी) : 99 हजार 900 रुपये
✔ iPhone 11 Pro Max (128 जीबी ) : 1 लाख 9 हजार 900 रुपये
भारतात 13 सप्टेंबरपासून फोनची प्री बुकिंग सुरू होणार असून 20 सप्टेंबरला हा फोन ग्राहकांना मिळू शकतो.
अ‍ॅपल टीव्ही :
● आता अ‍ॅपल टीव्हीचीही घोषणा करण्यात आली आहे.
● आयफोन, आयपॅड, अ‍ॅपल टीव्ही, आयपॉड टच तसेच मॅक या उपकरणांमध्ये अ‍ॅपल टीव्हीचा पर्याय देण्यात आला आहे.
● एक वर्षापर्यंत टीव्ही मोफत वापरता येईल.
● याशिवाय tvapple.com यावर प्रति महिना 4.99 डॉलर मोजून ते वापरता येईल.
● यावर द मॉर्निंग शो, डिकिन्सन, सी, फॉर ऑल मॅनकाइंड, द एलिफंट क्वीन यांसारखे शो, चित्रपट व डॉक्युमेंटरी पाहता येईल.
● 1 नोव्हेंबरपासून जगातील 100 शहरांमध्ये त्याचा प्रारंभ होणार आहे.
अ‍ॅपल वॉच
● अ‍ॅपल वॉच सिरीज 5 लाँच करण्यात आली असून याचे वैशिष्ट म्हणजे यामध्ये 18 तास चालणारी बॅटरी व ‘अल्वेज ऑन डिस्प्ले’ देण्यात आला आहे.
● रॅटिना डिस्प्ले असलेल्या या वॉचमध्ये दिशादर्शनासाठी होकायंत्र (कम्पास) असणार आहे.
● फोनची सुविधा असलेल्या वॉचची किंमत 499 तर, फोन नसलेल्या वॉचची किंमत 399 अमेरिकन डॉलर असेल.
● येत्या 20 सप्टेंबरपासून हे बाजारात उपलब्ध होणार आहे.
नवा आयपॅड :
● अ‍ॅपलने सेव्हन जनरेशन आयपॅडही सादर केला.
● 10.2 इंच रेटिना डिस्प्ले असलेल्या या आयपॅडमध्ये ए-10 फ्युजन चिप वापरण्यात आली आहे.
● अ‍ॅपल पेन्सिलही या आयपॅडसाठी वापरता येईल.
● या आयपॅडची किंमत 329 डॉलरपासून सुरू होईल. भारतात त्याची किंमत 29,900 रु. असेल.
● येत्या 30 सप्टेंबरला बाजारात दाखल होणार आहे.
भारतामध्ये हा नवा iphone सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

संपूर्ण घरभर केल अद्भुत डेकोरेशन | पाटील कुटुंबीयांनी | Aakarshan Ganrayache 2019


Saturday, 2 September 2017

मला भेटलेली एक सुंदर स्त्री!



एका संध्याकाळी सगळी कामं आटोपुन मंदिराबाहेरील एका आडबाजुच्या बाकड्यावर बसलो होतो, अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती. घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स अप बघावं म्हणुन मोबाईल काढला.... बघतो तो हँग झालेला... बापरे बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे करायचे? मोबाईल चालु करण्याचा खटाटोप चालु झाला... वैताग आला... मोबाईल काही सुरु होईना ....
काय करावं या विचारांच्या तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगर्या आवाजात कुणीतरी विचारलं, कोण हाय ...? मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघुन भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी....
आधी घाबरलो पण नंतर चिडुन विचारलं , काय बाई हि काय पद्धत आहे का ? दिसतंय का नाही तुला ? फटकन येवुन अशी अंगावर हात ठेवतेस ... घाबरलो ना मी...!
तशी म्हणाली, आवो मला दिसत नाय, हितंच मी भायेर भीक मागती, या टायमाला मी हितंच बसुन भाकर खाती... मापी करा, मी जाती दुसरीकडं ... मी ओशाळलो, म्हटलं, नाही बाई बसा इथंच , मी चाललोच आहे...
तिला बघुन अंगातला डॉक्टर जागा झाला, म्हणालो डोळे कशानं गेले? म्हणाली, लहानपणी डोळ्यातनं पाणी येत व्हतं लइ दुकायचे डोळे, आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यांनं कायतरी औशद सोडलं डोळ्यात , मरणाची आग झाली, नंतर डाक्टर म्हणला कसलंतरी अॕशीड व्हतं ते, डोळं आतुन जळल्यात , तवापासुन दिसणंच बंद झालं, 17 वर्साची व्हते मी तवा....
अरेरे ! तुमच्या आईबापाच्या आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे , आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर हि वेळ नसती आली... बेअक्कल असतात लोकं... मी सहज बोलुन गेलो. यावर मला वाटलं माझ्याच सुरात सुर मिसळुन ती आता त्यांना शिव्या शाप देईल, पण नाही, ती म्हणाली, नाय वो कुनाच्या आयबापाला वाटंल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणुन ? बिचाऱ्यानी त्यांना जे जमलं ते केलं... खेड्यात कुटनं आनायचा डाक्टर ? आणी आला तरी त्याला पैसं कुटनं दिलं आस्त ? माजं डोळं गेल्यावर डोकं आपटुन आपटुन माजा बाप गेला ...त्या बिचाऱ्याची काय चुक व्हती? माज्या आईनं, एकाद्या लहान बाळावानी माजं सगळं केलं... डोळं आसताना जेवडी माया नाय केली त्याच्या पेक्षा जास्त माया तीनं डोळं गेल्यावर केली.. मी चांगली आसते तर येवडी फुलावानी जपली आसती का मला ? डोळं गेल्याचा आसाबी फायदा आसतुया ... हसत म्हणाली...
वाईटातुन सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती हि बाई ?
तरी मी म्हणालो, मग भगताचं काय ... ? त्यांनं तर चुकीचं औषध सोडलं ना ?
म्हणाली, आसं कसं म्हणता सायेब, माजं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं ? आवो मला ते औशद लागु न्हाई झालं त्याला त्यो तरी काय करणार ? आवो माजं डोळं जाणारंच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त ... माज्या नशीबाचे भोग हुते ते ... त्या बिचाऱ्याचा दोष न्हाई... कुणी काही चांगलं करायला गेलं आन चुकुन वाईट झालं तर त्याला दोष देवु नाई... !
डाक्टर सुई टोचतो, पण बरं वाटावं म्हणुनच ना? त्याचा दुखवायचा इचार नसतो त्यात... आपुन आसं समजुन घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल...?
Intention is important behind every action या वाक्याचा सार या बाईने किती सहज सांगीतला ...!!!
पण आज्जी इतकी वर्षे तुम्ही काहिही न बघता कशा राहु शकला?
म्हणाली, न बघता? काय बघायचं राहिलंय ... आवो सगळं बगुन मनात साटवलंय .... वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत, सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय, पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीतली, कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीतली, फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीतलंय, मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय .... तुमी काय बगीतलं ह्यातलं ...? आवो ह्ये सगळं बगुन झाल्यावर राह्यलंच काय बगायला ?
तीच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे !
आज्जी तुमचं लग्न ....? चाचरत मी विचारलं... आज्जी म्हणाली, झालं हुतं की, त्यो बी आंदळा हुता, त्यानंच आणलं पुण्याला मला .... पदरात एक पोरगी टाकली, त्याच्या पुण्याईनं पोरगी आंदळी नव्हती ... म्हणलं चला चांगलं दिवस आलं ... पन त्योबी दोन वर्षातच गेला...... बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला.... !
आणि आज्जी तुमची पोरगी ? ती कुठाय ? आज्जी भकास हसली,म्हणाली, तीच्या विसाव्या वर्षी ती गेली तीच्या बापामागं त्याला शोधायला ... आता दोगं वरनं माजी मजा बगत आसतील .... स्वर्गात म्हणं नाचगाणी चालत्यात रोज, पन आमच्या आंदळ्याच्या नशीबात ते बी न्हाई मेल्यावर सुदा..... असं म्हणुन आज्जी हसायला लागली...
पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना.... इतकं सगळं भोगुनही हि इतकी निर्विकार !
आज्जी, या सगळ्यात दोष कुणाचा ?
कुणाचाच न्हाई, परत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला... आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं, का आन कसं ते इचारायचं न्हाइ... भाकर मिळाली तर म्हणायचं आज आपली दिवाळी, ज्या दिवशी मिळणार न्हाई म्हणायचं, चला आज उपास करु....
दोष कुनाला द्यायचा न्हाई... वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काहि कारणच नाही...
ते कसं आज्जी मला नाही समजलं ...
ह्ये बगा सायेब, एकाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय , दुसरा तरी हाय चांगला, दोनी हात गेलं तरी म्हणावं पाय तरी हायेत माजे आजुन... आता माजं बगा, दोनी डोळं गेलं तरी बोलता येतंय ना मला ???
काय बोलावं मलाच कळेना, या विद्रुप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती ? वयामुळं हा पोक्तपणा आला असेल कि, भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल ?
काहिही असो एव्हढ्या सुंदर विचाराची, वाईटातुन चांगलंच शोधण्याचा प्रयत्न करणारी, वरवर विचित्र दिसणारी आजी तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली !!!
Source : मराठी कविता ब्लॉग

Tuesday, 4 July 2017

१५,६०,००० कोटी रुपये रोकड बाळगणारी कंपनी



"आईनस्टाईन म्हणायचा ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्त्वाची ."
हे पटवून देताना कालच्या लोकसत्तातून गिरीश कुबेरनी फारच सुंदर लेख लिहला आहे..
गेल्या आठवड्यात आपल्या देशाच्या भांडवली बाजाराचा निर्देशांक ३० हजारांच्या पुढे गेला. त्याच कालावधीत अँपल कंपनीचे भांडवली बाजारातील मुल्य तब्बल ८०४ बिलियन डाँलर इतके प्रचंड वाढले. 
अजून सोपे सांगायचं तर ५२,२६,००० कोटी रुपये इतकी झाली . आपल्या देशातल्या सर्व कंपन्यांचे बाजारमुल्य आहे ५२,१५,००० कोटी.
अजून सोपं .......
अँपलकडे आजमितीला रोख रक्कम आहे १५,६०,००० कोटी रुपये आणि आपल्या देशातल्या तीन सर्वाधिक मौल्यवान कंपन्यांचं (रिलायन्स , टिसीएस आणि एचडिएफसी बँक ) एकत्रित मूल्य आहे १३,००,००० कोटी रुपये . म्हणजे अँपलने या तीनही कंपन्या विकत घ्यायचे ठरवले तरी २ लाख कोटी शिल्लक राहतील .....
हे तर काहीच नाही अँपलचे मुल्य ब्राझील, सिंगापूर ,मलेशिया वगैरे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुल्यापेक्षाही अधिक आहे.
वरच्या संख्यापुराणाचा सारांश खूप खूप महत्त्वाचा आहे..........
आज जगातल्या पहिल्या पाच कंपन्या आहेत अँपल , अँमेझाँन, अल्फाबेट म्हणजे गुगल, मायक्रोसाँफ्ट आणि फेसबुक.
या सर्व कंपन्यावर नजर टाकताच लक्षात येईल की,
१) या पाचही कंपन्या नवअर्थकाळातल्या आहेत.
२) या पाचही कंपन्या या पहिल्या पिढीच्या आहेत.
३) या पाचही कंपन्या म्हणजे एक कल्पना होती.
४) या पाचही कंपन्या एकाच देशात जन्मलेल्या आहेत. तो म्हणजे अमेरिका . त्यातही ही सर्व मूळ अमेरिकनच्या पोटी जन्माला आलेली नाहीत तर ती निर्वासीतांची मुलं आहेत.
५) आतातरी कल्पनाशक्तीला महत्त्व द्यायला शिकलं पाहिजे . ज्ञानाला मर्यादा असतात पण कल्पनाशक्तीला नाही. ज्ञान भरपूर आहे पण त्याचं काय करायचं हेच माहीत नसेल तर काय उपयोग ? तेव्हा ज्ञान कमी असलं तरी एकवेळ चालेल पण कल्पनाशक्ती हवीच हवी.
"कल्पनाशक्तीला मुक्त वाव द्यावा" .
हे लिहू नका, ते वाचु नका, हेच खा, हे खाऊ नका..... अशा निर्बंधी समाजाची संतती किरटीच असते.

लेखक - अज्ञात
सौजन्य - व्हाट्सअप
------------------------------------------
हा लेख आवडला तर जरूर जरुर शेअर करा ! प्लिज !!

हा फेरीवाला कमावतो ७००० रु. रोज



शाहिद, सोनाक्षीचा ड्रायव्हर आता विकतोय मोमोज्!
गेल्या काही वर्षांपासून मुंबईत मेदू वडा, इडली विकणाऱ्या अण्णांना एव्हाना मुंबईकरांच्या जीभेची चांगलीच चव कळलेली आहे. मात्र, या अण्णांना दार्जिलिंगच्या लामाने चवीच्या बाबतीत मात दिल्याचे दिसतेय. मूळचा दार्जिलिंग येथील मिरिक गावचा असलेल्या सूरज तमंग लामाने आपल्या चवदार मोमोजने सध्या वर्सोवा आणि यारी रोडवरील नागरिकांचे मन जिंकले आहे. विशेष म्हणजे, फार वर्षांपूर्वीपासूनची व्यवसाय सुरु करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लामाने चक्क त्याची चांगली नोकरीही पणाला लावली. ‘मिड डे’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बॉलीवूड सेलिब्रिटींचा ड्रायव्हर असलेल्या लामाने गेल्या महिन्यापासून सायकलवर मोमोज विकण्यास सुरुवात केली आहे.
सूरज लामा गेली २५ वर्ष अगदी प्रामाणिकपणे बॉलीवूड सेलिब्रिटींचा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. पण, आता नोकरी सोडून स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याची वेळ आली आहे, असा विचार मनात आलेल्या लामाने अखेर सायकलवर मोमोज विकण्यास सुरुवात केली. याविषयी ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, ‘ड्रायव्हरची नोकरी करताना मी समाधानी नव्हतो. सध्या ओला आणि उबरचा व्यवसाय विस्तारत असल्यामुळे खासगी ड्रायव्हरला असलेली मागणी हळूहळू कमी होत आहे. लामाने यापूर्वी सोनाक्षी सिन्हा आणि शाहिद कपूर या बॉलीवूड कलाकारांकडे काम केले आहे. मला मोमोज बनवायला आवडतात यामुळे मला घरची आठवण येते. जेव्हा मी पहिल्यांदा मोमोज बनवलेले ते सोनाक्षीने आवडीने खाल्ले होते. मला माहित होते की तिला दिलेले मोमोज् फार छान झाले होते. सोनाक्षीनेही मला याची पोचपावती दिलीच. पण, मी बनवलेले मोमोज् इतरांना आवडतील की नाही याबाबत मी साशंक होतो, असेही लामा म्हणाला.
पुढे लामा म्हणाला की, मोमोज करण्यासाठी मी माझ्या आईने सांगितलेल्या पाककृतीचाच वापर करतो. यात मी कोणत्याच कृत्रिम रंगाचा वापर करत नाही. महिन्याच्या अखेर केवळ २० हजार पगार मिळवणारा लामा आता दिवसाला तब्बल ७ हजार रुपये कमावतो. सध्या तो शाकाहारी मोमोज ४० रुपयांना तर मांसाहारी मोमोज ५० रुपयांना विकतो. या कामाने समाधान मिळत असल्याने भविष्यात लामाला स्वतःचे दुकान सुरु करण्याची इच्छा आहे.
सौजन्य : दैनिक लोकसत्ता 

Friday, 10 February 2017

Be the CEO of your own Life

प्रत्येकाने वाचावा असा अप्रतिम लेख....
Be the CEO of your own Life ....
परत परत नक्की वाचा बघा फरक पडेल आपल्या आयुष्यात....
----------------------------------
दोन दिवसांपूर्वीची गोष्ट…
कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो. मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसी ची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो.
पेपर खरं तर, नावाला, माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती.
(एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो. असो.)
माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला. जेमतेम चाळीशीचा असावा.
जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट. हातात मराठी पुस्तक. खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला. रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले. ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं.
न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली...
पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला, ’वाचन आवडतं?’
‘प्रचंड. रीडिंग इज माय ‘फर्स्ट लव्ह’.
आजूबाजूला ‘सौ’ नाही हे बघत मी म्हटलं.
‘किती वाचता रोज?’
‘रोज असं नाही…अं... अं…काही खास ठरवलेलं नाही. इच्छा झाली की वाचतो.’
अनपेक्षित यॉर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.
‘खायला आवडतं?’
कॉन्जीक्युटीव्ह यॉर्कर.
‘प्रचंड. इटिंग इज माय ‘सेकंड लव्ह’.’
‘हो? मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा….?’
‘नाही नाही…रोज दोन वेळा... आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच...
हिट विकेट !
तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण... तसंच वाचन !’
‘बरा वेळ मिळतो तुम्हाला.’ दयनीय चेहरा करत मी म्हटलं...
‘वेळ मिळत नाही. मी काढतो. ‘वेळ’ ही जगातली सगळ्यात ‘टेकन फॉर ग्रान्टेड’ गोष्ट आहे असं मी मानतो...
फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना ! फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला ! मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणार आहे' असं कोणी म्हटलं नां! की माझी खात्री होते, नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तो ‘यम’ त्याला हसत असेल !’
मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’
मी आणखी हसू लागलो.
‘आय ऍम प्रीटी सिरीयस... तुम्ही पाहिलंय यमाला ? हो, मी पाहिलंय. दोन वर्षांपूर्वी.
रस्ता क्रॉस करत होतो. समोरून भरधाव गाडी आली. त्या दिव्यांच्या प्रकाश झोतातही मी अंधार पाहिला. त्या दोन सेकंदात मला ‘मृत्यूने’ दर्शन दिलं. त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच.
गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो... हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन...
मी ‘देव’ पाहिला नव्हता पण ‘मृत्यू’ पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो.
माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही ‘मी’ अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस ! तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’
‘अर्थात! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात... मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं...
‘साफ चूक'! माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर ‘उद्या’ नसतो !’
‘मी समजलो नाही.’
‘प्रत्येक काम आपल्याला ‘उद्यावर’ टाकायची संवय असते....
वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे…
गंमत म्हणजे, आहेत ते पैसे देखील आपण ‘आज’ उपभोगत नाही....
ते कुठेतरी गुंतवतो.... भविष्यात ‘डबल’ होऊन येतील म्हणून!
या ‘उद्या’ वर आपला फार भरवसा असतो... मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो...
आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हा ‘उद्या’ बघायची संधी देत नाही !
मृत्यू म्हणजे – आहोत तिथे, आहोत त्या क्षणी फुल स्टॉप !
खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो.
तुमच्यावरील या ‘अन्याया’ विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही...
माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका ‘उद्या’ पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो...
म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं, यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं....
इतके दिवस जेवण नुसतंच ‘गिळलं’, या पुढे एकेका घासाची मजा घ्यायची....
आयुष्याची ‘चव’ घेत जगायचं. ’
‘म्हणजे नक्की काय केलं?’ माझी उत्सुकता आता वाढली होती.
‘माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली....
मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’
‘कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचा ‘सीईओ’ वगैरे… जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.
‘वेल… तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही...
आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी ‘माझ्यापुरते केलेत त्यामुळे…’
‘मग... तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत?’ त्याला मधेच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं.
‘म्हटलं तर खूप, म्हटलं तर कोणीच नाही.’ तो खांदे उडवत म्हणाला.
मला न कळल्याचं पाहून तो पुढे बोलू लागला...
‘मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत डील करतो...
दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ.
माझ्या बोर्डवर विविध माणसे डायरेक्टर आहेत...
फरहान अख्तर,
शिवाजी महाराज,
अब्दुल कलाम,
डॉ. बी. आर. आंबेडकर
चार्ली चॅप्लीन,
महात्मा गांधीजी,
अमिताभ,
हेलन केलर,
जे आर डी टाटा
इत्यादी इत्यादी’...
माझ्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.
‘या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं, या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे.
काही क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात.
मी काय करतो… अं… उदाहरण देतो…
समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझे ‘एथिक्स डायरेक्टर’ गांधीजींना विचारतो,
काय करू?
मग ते सांगतील ते करतो.
व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझे ‘हेल्थ डायरेक्टर’ फरहान अख्तर मला काय म्हणतील, या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो.
कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं.
मग माझ्या ‘इन्स्पीरेशन डायरेक्टर’ हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामुली वाटू लागतात.
कधी दुःखी झालो तर ‘इंटरटेनमेंट डायरेक्टर’ चार्ली चॅप्लीन भेटायला येतात…’
माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला...
’मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल'.
पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचा ‘सीलॅबस’ बनवावा हे उत्तम !
आपण अनेकदा ‘इतरांप्रमाणे’ आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो...
जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत.
हजारो वर्षे माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय...
गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं - Be your own light...
मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल !’
मी त्या तरुणाला नाव विचारलं, त्याने लगेच सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
चार पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला,
‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं,
मी एका ऍक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो.
तुम्ही…प्लीज... कुठल्या ऍक्सिडेंटची वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.
अपघात फक्त वाहनांमुळेच होतात, असं थोडीच आहे?
ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच भेटला की!
घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. ‘प्ले झोन’ मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं...
वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली...
मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता...
त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.
मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असे ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ नेमले, तर त्यात ‘त्याचा बाप’ असेल का?’
परवाच्या रात्री बराच वेळ जागा राहिलो.
कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्य ‘चवीने’ जगत राहायची उर्जा देत राहील !
प्रत्येकाने वाचावा असा हा अप्रतिम लेख ......
.......परत परत नक्की वाचा.........



source - https://www.facebook.com/naviarthkranti/posts/1439429242743851:0

Saturday, 4 February 2017

मराठी धंदे बंद पडतात…ते उगीच नाही…!


काल एका मित्राशी बोलणं झालं. आम्ही दोघांनी साधारण एकाच काळात जॉब सोडून स्टार्ट अप सुरू केलेले. पार थकून गेल्यासारखा वाटत होता.
स्टार्ट अप इको सिस्टीम मध्ये एक अलिखित नियम आहे – हसरा चेहरा बाळगत फिरण्याचं…!

माझं स्टार्ट अप आहे, आम्ही एकदम रॉकिंग फेज मध्ये आहोत, आमचे आकडे धमाकेदार घोडदौड करत आहेत…
हे सतत भासवत राहवं लागतं. अर्थात, हे बहुतेक वेळा खरंच असतं. पण ते साध्य होत असताना येत असलेला तणाव दिसू देता येत नाही. हसरा चेहरा सतत मेंटेन ठेवणं मजाक नसते. बिझनेस गोल्स साध्य करत असताना २४ तास मेंदू सतत तणावाखाली असतो, पण तो तणाव दिसू द्यायचा नसतो.
उद्योगात नव्याने मुसंडी मारणाऱ्याने ती तयारी केलेली असतेच – त्रास तेव्हा अनावर होतो जेव्हा बिझनेस प्रेशर शिवाय इतर कटकटी सुरू होतात. नोकरी सोडून बिझनेस करायचा निर्णय घेताना हा मित्र घरी व्यवस्थित बोलला होता. पुढे दोन अडीच वर्ष कठीण असतील, मुव्हीज-शॉपिंग-हॉटेलिंग-ट्रॅव्हलिंग– ही मध्यमवर्गीय हौस बाजूला ठेवावी लागेल, घरात इन्व्हॉल्व्हमेंट कमी असेल. ही सर्व कल्पना त्याने दिली होती. (मला हे माहितीये कारण आम्ही दोघांनी ही पावलं एकमेकांशी चर्चा करत करतच उचलली होती.)
तेव्हा होकार देणारी फॅमिली आज मात्र सैरभैर झाल्यासारखी वागतीये.

बायकोने तेव्हा दाखवलेला सपोर्ट १२ महिन्यात उडून गेलाय. घरात सारखी किरकिर होतीये आणि हा रोज बिझनेस टार्गेट अचिव्ह करण्याच्या टेन्शनमध्ये!
त्याच्या प्रोडक्टला प्रतिसाद उत्तम आहे पण अपेक्षित होता तेवढा पैसा उभा रहात नाहीये. त्यामुळे बिझनेस प्लॅनिंग, फ्युचर अप्रोच सर्व काही बदलावं लागणार आहे. तो ती लढाई लढायला तयार आहे – मला पक्कं माहितीये – पण ही घरातली लढाई कशी लढेल?! एकाच वेळी २ फ्रंटवर कसं लढणार?! ज्या सैन्याच्या जोरावर लढायचं होतं, ते सैन्यच कुरबुरी करत असेल तर साम्राज्य कसं उभं रहाणार?

हा माझा मित्र एकदम रॉकस्टार आहे. ह्या अडचणीतून तो पुढे जाईल ह्यात शंकाच नाही. पण अश्या अडचणी अनेकांना येत असणार…त्यात कितीतरी जण अडकून जात असणार ही कल्पना त्रासदायक आहे!
मराठी धंदे बंद पडतात…ते उगीच नाही…!
टीप:
१) वरील उदाहरणात “बायको” हा फॅक्टर आहे. परंतु नेहेमी पत्नीचीच चूक असते असं नाही. एकूण कुटुंबाच्या सपोर्टची गरज असते – हा मूळ मुद्दा आहे.
२) दुसरा मुद्दा असा की – नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणे हा खूप मोठा निर्णय असतो. तो सर्वांनी मिळून घ्यायचा असतो. जर भक्कम समर्थन देण्याची मानसिक तयारी नसेल, तर असा निर्णय घेण्याआधीच कुटुंबाने स्पष्ट सांगायला हवं. निर्णय घेतल्यावर मग मानसिक ताण देऊ नये…त्याने अपयशाची शक्यता वाढते.
३) कौटुंबिक समर्थन, घरातील वातावरण हे व्यवसायातील यश-अपयशामागच्या अनेक कारणांपैकी एक आहे. “केवळ” ह्या मुळेच अपयश येतं, असा अर्थ अजिबात नाही!
४) एकतर स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा कमी, इच्छा असेल तर कुटुंबाचं समर्थन नाही आणि समर्थन असेल तर केवळ होकार देण्यापुरतं – पाठीशी उभं रहाणं नाही — असं सर्वसाधारण चित्र मराठी कुटुंबांत दिसतं — ह्या निरीक्षणावरून “मराठी धंदे बंद पडतात…ते उगीच नाही…!” हा निष्कर्ष आहे. जर ही परिस्थिती आता बदलत असेल…तर सोन्याहून पिवळं! जर बदलत नसेल…तर आपण बदलायला हवी हे मात्र नक्की.
sources - marathipizza.com

Saturday, 7 January 2017

हमालाचा मुलगा बनला १०० कोटी रुपयांचा मालक


तो. गरीब घरातला मुलगा. वडील एका कॉफीच्या मळ्यावर हमालींचं काम करायचे. आई घर सांभाळायची. तीन लहान बहिणी. हाच सर्वांत मोठा. सहावीत असताना नापास झाला. शाळा सोडून आता तु पण कामाला लाग म्हणून त्याचे वडील त्याला कामाला घेऊन जाणार होते. पण एका शिक्षकामुळे ‘तो’ सावरला. शिक्षकाने त्याला घडविला. त्यामुळेच तो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेतून इंजिनियर झाला. इतकंच नव्हे तर आयआयएम- बंगलोर मधून एमबीए झाला. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून काम केलं. पण आपल्यासारखीच आपल्या गावातल्या मुलांची आबाळ होऊ नये म्हणून लाख रुपये पगार असलेल्या नोकरीवर पाणी सोडून त्याने स्वत:ची कंपनी सुरु केली. आज त्याची आयडी फ्रेश नावाची कंपनी शंभर कोटींच्यावर उलाढाल करीत आहे. जगात काहीच शक्य नाही असा निव्वळ म्हणणाराच नव्हे तर सत्यात उतरविणारा ‘तो’ म्हणजे पीसी मुस्तफा.

केरळ मधल्या वायनड येथील चेन्नलोड हे एक छोटंसं खेडं. या गावातील अहमद हा एका कॉफीच्या मळ्यावर हमाली काम करायचा. बायको, एक मुलगा आणि तीन मुली असा एकूण अहमदचा परिवार. खेडं दुर्गम असल्याने चौथीपर्यंतच शाळा. हायस्कूलसाठी ४ किलोमीटर चालत जावं लागे. त्यामुळे अर्ध्याहून अधिक मुलं पुढे शिकायचीच नाहीत. अहमद पण चौथीपर्यंतच शिकला. आपला मुलगा मुस्तफाने तरी खूप शिकावं असं त्याला वाटे. मात्र इंग्रजी आणि हिंदीत तो अगदीच कच्चा होता. सहावीत असताना मुस्तफा नापास झाला. शिक्षण बास झालं, आता माझ्यासोबत कामाला चल. चार पैसे कमव, असं बोलून अहमद मुलाला कामावर घेऊन जाणार होता. मात्र मुस्तफाच्या शिक्षकांनी, मॅथ्थ्यू सरांनी अहमदला मुस्तफास एक संधी देण्यास सांगितले. अहमद तयार झाला. मॅथ्थ्य़ू सरांनी मुस्तफाला एकच प्रश्न विचारला. तुला नापास होऊन हमालकाम करायचं आहे की माझ्यासारखं शिकून शिक्षक व्हायचंय? मला तुमच्या सारखं शिक्षक व्हायचंय, मुस्तफा उत्तरला. या उत्तराने मुस्तफाचं आयुष्यंच बदलून गेलं.

मॅथ्थ्यू सर मुस्तफाला शाळा संपल्यानंतर सुद्धा शिकवित. त्यांच्या शिकवण्यामुळे मुस्तफा चांगलाच तयार झाला. त्याने सातवीत पहिला नंबर मिळविला. सगळेच शिक्षक अचंबित झाले. एवढंच नाही तर १० वी मध्ये सुद्धा तो संपूर्ण शाळेत पहिला आला. त्या विद्यार्थीदशेत त्याचं एकच ध्येय होतं मॅथ्थ्यू सरांसारखं बनायचं. सर त्याचे आदर्श होते. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुस्तफा कोझीकोडे(कालिकत) मध्ये गेला. पहिल्यांदाच गावातून शहरात तो गेला. शिक्षणासाठी पैसे नव्हते मग राहणं आणि खाणं तर दूरचीच बात. मात्र अहमदच्या मित्राने मुस्तफाची अभ्यासाप्रती तळमळ आणि गुणवत्ता पाहिली. त्याने एका धर्मादाय संस्थेच्या वसतीगृहामध्ये त्याची मोफत राहण्याची व्यवस्था केली. त्याच्या महाविद्यालयात चार वसतीगृहे होती. तिथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिले जाई. पण मुस्तफाला सकाळच्या न्याहरीसाठी एका वसतीगृहात, दुपारच्या जेवणासाठी दुसऱ्या तर रात्रीच्या जेवणासाठी तिसऱ्या वसतीगृहात जावे लागे. इतर मुलांना मुस्तफा निरुपयोगी, इतरांच्या अन्नावर जगणारा मुलगा वाटायचा. मुस्तफाने हा अपमान गिळला आणि शिक्षण पूर्ण केले. मुस्तफा संगणक विषयात अभियंता झाला. त्यासाठी दिलेल्या पात्रता परिक्षेत तो संपूर्ण राज्यात ६३ वा आला. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामवंत संस्थेतून त्याने अभियंत्याची पदवी मिळविली.
सुरुवातीला एका छोट्या कंपनीत काम केल्यानंतर मोटोरोला कंपनीने त्याला जॉब ऑफर दिली. काही दिवस बंगलोर येथे काम केल्यानंतर त्याची आयर्लंड येथे बदली झाली. आयर्लंडचा विमान प्रवास हा मुस्तफाच्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास होय. आयर्लंड मध्ये मुस्तफाला आपल्या देशाची, येथील जेवणाची, कुटुंबाची, मित्रांची खूप आठवण येई. त्याला तिकडे जुळवून घेता आलं नाही. याचदरम्यान दुबई मधून त्याला सिटी बॅंकेची ऑफर आली आणि तो दुबईला गेला. त्यावेळेस त्याला लाखाच्या आसपास पगार होता. घरचं कर्ज फेडण्यासाठी त्याने आपल्या मित्राकरवी वडलांकडे एक लाख रुपयांची रोख रक्कम पाठवून दिली. आपल्या मुलाने एवढे सारे पाठवलेले पैसे पाहून अहमद ओक्साबोक्सी रडला. आलेल्या पैशातून त्याने सर्व देणी फेडली. मोठ्या मुलीचं लग्न देखील केलं. सन २००० मध्ये मुस्तफाचं सुद्धा लग्न झालं.

सर्व काही सुरळीत चाललेलं असताना २००३ मध्ये मात्र मुस्तफाला आपली मायभूमी खुणावत होती. त्याला आता समाजाची, आपल्या देशाची परतफेड करायची होती. आपल्या सारख्य़ा असंख्य बेरोजगार तरुणांना रोजगार द्यायचा होता. त्यासाठी त्याने उद्योजक बनायचं ठरविलं आणि तो दुबईहून परतला. मात्र काय उद्योग करावा हेच सुचत नव्हतं. सोबत होते बचत केलेले १५ लाख रुपये. एवढी चांगली नोकरी सोडून उद्योग करणार या मुस्तफाच्या विचाराला घरच्या सगळ्यांनीच त्याला विरोध केला. अपवाद होती फक्त मुस्तफाची बायको आणि त्याचा मामेभाऊ नासीर जो किराणामालाचं दुकान चालवायचा. दरम्यान मुस्तफाने एमबीए करण्यासाठी आयआयएम- बंगलोर मध्ये प्रवेश घेतला. याचवेळी मुस्तफाचा दुसरा एक मामेभाऊ शमसुद्दीन याने पाहिले की डोसा पिशवी मध्ये रबराने बांधून तो दुकानात विकला जातो. आपण अशाच प्रकारे डोसा बनवून विकूया असे त्याने मुस्तफाला सुचविले.

शमसुद्दीनच्या या सूचनेने मुस्तफाला अल्लाऊद्दीनचा चिराग सापडल्याचा आनंद झाला. त्याने २५ हजार रुपये गुंतवून कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. नासीर, शमसुद्दीन, जाफर, नौशाद असे इतर चार मामेभाऊ आणि मुस्तफा अशा पाच जणांनी मिळून कंपनी सुरु केली. यामध्ये ५० टक्यांची भागीदारी एकट्या मुस्तफाची तर इतरांची ५० टक्के भागीदारी असे समीकरण ठरले. ५५० चौरस फुटांची जागा, २ ग्राइंडर, १ मिक्सर आणि एक सिलींग मशीन अशा अवजारांसहीत कंपनी सुरु झाली. कंपनीचं नामकरण ‘आयडी फ्रेश’ असं करण्यात आलं. आजूबाजूची २० दुकाने सुरुवातीचं लक्ष्य ठरलं. येत्या सहा महिन्यात या २० दुकानांमध्ये दररोज १०० पाकिटे गेली तर मुस्तफाने कंपनीत आणखी गुंतवणूक करण्याचे ठरविले. सुरुवातीला १० पाकिटे ठेवायचं निश्चित झालं. मात्र कोणीही दुकानदार कंपनी नवीन असल्याने पाकिट ठेवायला तयार नसत. विक्री झाल्यावरच पैसे द्या अशी शक्कल मुस्तफाच्या कंपनीने लढवली. लोकांना आयडी फ्रेशचे डोसे आणि इडली आवडल्याने मागणी वाढली. इतर दुकानांकडून मागणी आली. नवव्या महिन्यापासून दिवसाला १०० पाकिटे विकली जाऊ लागली.

पहिल्याच महिन्यात सगळा खर्च जाऊन कंपनीने ४०० रुपये नफा कमाविला. १०० पाकिटे विक्री होऊ लागल्यावर मुस्तफाने आणखी ६ लाख रुपये गुंतविले. २००० किलो क्षमतेची २००० पाकिटे दरदिवशी विकली जाऊ लागली. २००८ मध्ये मुस्तफाने आणखी ४० लाख रुपये गुंतविले. होस्कोट येथे २५०० चौरस फुटाची जागाच कंपनीने विकत घेतली. डोसा, इडली सोबत आता पराठे आणि वड्याचा देखील आयडी फ्रेश मध्ये समावेश झाला.
आज कंपनी ५० हजार किलोचं दरदिवशी उत्पादन करते. कंपनीची उलाढाल १०० कोटी रुपयांची आहे. ११०० कामगार कार्यरत आहेत. १० पाकिटांनी सुरु झालेली ही कंपनी आता दिवसा ५० हजार हून अधिक पाकिटांची विक्री करते. बेंगलुरु, चेन्नई, पुणे, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, मंगळुरु आणि दुबई अशा महत्वाच्या शहरात ही उत्पादने उपलब्ध आहेत. येत्या ५-६ वर्षांत १ हजार कोटी रुपयांची कंपनी करण्याचा मुस्तफाचा मानस आहे. त्याचप्रमाणे ५ हजार युवकांना आपली कंपनी रोजगार देईल असा आशावाद मुस्तफाला आहे.

सहावीत नापास होऊन देखील आज १०० कोटी रुपयांची कंपनी चालविणारा एका हमालाचा मुलगा ही मुस्तफाची ओळख. परिस्थितीला दोष देत स्वत:च्या गरिबीचं समर्थन करणाऱ्या आणि यंत्रणेला दोष देणाऱ्या तरुणांसाठी मुस्तफा खऱ्या अर्थाने आदर्श ठरावा.

----------------------------------------


Source : https://www.facebook.com/prasawant/posts/10209084843907100