गेल्या काही वर्षांपासून मुंबईत मेदू वडा, इडली विकणाऱ्या अण्णांना एव्हाना मुंबईकरांच्या जीभेची चांगलीच चव कळलेली आहे. मात्र, या अण्णांना दार्जिलिंगच्या लामाने चवीच्या बाबतीत मात दिल्याचे दिसतेय. मूळचा दार्जिलिंग येथील मिरिक गावचा असलेल्या सूरज तमंग लामाने आपल्या चवदार मोमोजने सध्या वर्सोवा आणि यारी रोडवरील नागरिकांचे मन जिंकले आहे. विशेष म्हणजे, फार वर्षांपूर्वीपासूनची व्यवसाय सुरु करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लामाने चक्क त्याची चांगली नोकरीही पणाला लावली. ‘मिड डे’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बॉलीवूड सेलिब्रिटींचा ड्रायव्हर असलेल्या लामाने गेल्या महिन्यापासून सायकलवर मोमोज विकण्यास सुरुवात केली आहे.
सूरज लामा गेली २५ वर्ष अगदी प्रामाणिकपणे बॉलीवूड सेलिब्रिटींचा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. पण, आता नोकरी सोडून स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याची वेळ आली आहे, असा विचार मनात आलेल्या लामाने अखेर सायकलवर मोमोज विकण्यास सुरुवात केली. याविषयी ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, ‘ड्रायव्हरची नोकरी करताना मी समाधानी नव्हतो. सध्या ओला आणि उबरचा व्यवसाय विस्तारत असल्यामुळे खासगी ड्रायव्हरला असलेली मागणी हळूहळू कमी होत आहे. लामाने यापूर्वी सोनाक्षी सिन्हा आणि शाहिद कपूर या बॉलीवूड कलाकारांकडे काम केले आहे. मला मोमोज बनवायला आवडतात यामुळे मला घरची आठवण येते. जेव्हा मी पहिल्यांदा मोमोज बनवलेले ते सोनाक्षीने आवडीने खाल्ले होते. मला माहित होते की तिला दिलेले मोमोज् फार छान झाले होते. सोनाक्षीनेही मला याची पोचपावती दिलीच. पण, मी बनवलेले मोमोज् इतरांना आवडतील की नाही याबाबत मी साशंक होतो, असेही लामा म्हणाला.
पुढे लामा म्हणाला की, मोमोज करण्यासाठी मी माझ्या आईने सांगितलेल्या पाककृतीचाच वापर करतो. यात मी कोणत्याच कृत्रिम रंगाचा वापर करत नाही. महिन्याच्या अखेर केवळ २० हजार पगार मिळवणारा लामा आता दिवसाला तब्बल ७ हजार रुपये कमावतो. सध्या तो शाकाहारी मोमोज ४० रुपयांना तर मांसाहारी मोमोज ५० रुपयांना विकतो. या कामाने समाधान मिळत असल्याने भविष्यात लामाला स्वतःचे दुकान सुरु करण्याची इच्छा आहे.
सौजन्य : दैनिक लोकसत्ता
No comments:
Post a Comment